चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी महाराष्ट्रात दोन अत्याधुनिक स्टुडिओ उभारले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज केली. मुंबईत सुरू असलेल्या वेव्हज् परिषदेत भारत पेव्हेलियनला मुख्यमंत्र्यांनी आज भेट दिली, त्यावेळी त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. या दोन स्टुडिओच्या उभारणीसाठी प्राईम फोकस आणि गोदरेजसोबत सामंजस्य करार केले आहेत. या स्टुडिओंमधे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चित्रीकरण करता येईल, असं त्यानी सांगितलं. गोदरेजच्या सहाय्यानं पनवेलमधे दोन हजार एकर जागेवर चित्रनगरी उभारली जाणार असून यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच, आता चित्रनगरी उभारण्यासाठी जागेची नाही, तर तंत्रज्ञानाची गरज आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी आज राष्ट्रीय शेअर बाजाराच्या Nifty Waves Index चं अनावरण केलं. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातल्या ४३ कंपन्याच्या समभागांचा सहभाग या निर्देशांकात आहे. राज्य सरकारनं आज दोन विदेश विद्यापीठांशी सामंजस्य करार केले. नवी मुंबई इथं एज्यु सिटी तयार करणार असून, यात जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठांपैकी दहा ते बारा विद्यापीठं आणली जाणार आहेत, अशाच प्रकारच्या दोन विद्यापीठांशी आज करार झाले. या अंतर्गत दोन्ही विद्यापीठं प्रत्येकी पंधराशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.