प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत आणखी ३ हजार रुपये देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेंतर्गत मिळणाऱ्या रकमेत राज्य शासनातर्फे ३ हजारांची वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नागपूर इथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेत मिळणारे ६ हजार रुपये आणि राज्य शासनाच्या नमो कृषी सन्मान योजनेचे ६ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात. त्यात आता राज्य शासनाकडून ३ हजार रुपयांची वाढ करण्यात येत असून शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच १५ हजार रुपये जमा होतील. या योजनेच्या माध्यमातून छोटे शेतकरी तसंच शेतीउत्पादक गटांना फायदा होत असून शेतकऱ्यांना वीज बिल माफी, सौर पंप योजना या योजनांचाही लाभ होत असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले.