चार धाम यात्रा आजपासून सुरू होत असून उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी काल या यात्रेच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली. येत्या दोन मे पासून भाविकांना केदारनाथ धाममध्ये दर्शन घेता येणार आहे. चार धाम यात्रा 2025 साठीच्या नोंदणीही कालपासून सुरू झाली.
दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि परदेशी नागरिकांसाठी विशेष काऊंटर उभारण्यात येत आहेत. तसंच २० मोफत नोंदणी काऊंटर सुरू करण्यात आले आहेत, असं धामी यांनी आपल्या समाज माध्यमांवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या पवित्र स्थळांवर हजारोंच्या संख्येनं येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी उत्तराखंड सरकारनं चोख व्यवस्था केली असून या यात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्यातही सुरक्षा व्यवस्था कडक करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.