डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय शिकवण्यासंदर्भात काढलेले दोन्ही शासन निर्णय रद्द

राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय शिकवण्यासंदर्भात काढलेले दोन्ही शासन निर्णय रद्द करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज केली. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानानंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. शालेय शिक्षणात तिसरी भाषा कधीपासून शिकवावी, ती कोणती असावी, कशी शिकवली जावी, यासंदर्भात शिफारशी करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी केली. या समितीनं अहवाल सादर केल्यानंतर त्यानुसार पुढचा निर्णय घेऊ, असं ते म्हणाले. विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला आणि सरकारला एक पत्रही दिलं. मात्र विरोधकांकडे कोणतेही नवे मुद्दे, कल्पकता, लोकाभिमुखता नाही, अशी टीका फडनवीस यांनी केली. सत्तेत असताना एक आणि सत्तेबाहेर असताना एक, असं विरोधकांचं धोरण असल्याचा आणि केवळ विरोधाला विरोध होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसंच इतर नेते यावेळी उपस्थित होते.