डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ड्रंप यांच्यावर निवडणूक प्रचारसभेत हल्ला

 

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. प्रधानमंत्र्यांनी या घटनेचा निषेध केला असून राजकारणात आणि लोकशाहीत हिंसेला कोणतंही स्थान नाही असं समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. ट्रंप यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या हल्ल्यातल्या मृतांचे कुटुंबीय, जखमी व्यक्ती आणि अमेरिकी नागरिकांच्या दुःखात भारत सहभागी आहे, असंही त्यांनी सांगितलं. 

 

अमेरिकेत पेनिसिल्व्हेनिया इथं एका प्रचार सभेदरम्यान अचानक झालेल्या हल्ल्यात डोनाल्ड ट्रंप जखमी झाले तर एक बंदूकधारी आणि प्रेक्षकांमधला एक जण मारले गेले. हल्ला झाल्यानंतर ट्रंप व्यासपीठावर कोसळले असता  सिक्रेट सर्व्हिस एजंट्सनी त्यांना सावरलं. सिक्रेट सर्विसच्या जवानांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल ट्रम्प यांनी त्यांचे आभार मानले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून  ट्रम्प सुरक्षित असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. लोकशाहीत राजकीय हिंसाचाराला अजिबात स्थान असता कामा नये अशा शब्दात  अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी निषेध व्यक्त केला आहे. अमेरिकेच्या उप राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी ही घटना धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे.

 

ट्रंप यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल जगभरातून निषेध व्यक्त होत आहे. हा राजकीय हिंसाचार असल्याचं संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनिओ गुटेरस यांनी म्हटलं आहे, तर  ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टारमर आणि कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टीन ट्रुडो यांनीही तीव्र निषेध केला आहे. याशिवाय ब्राझील, जपान, कॅनडा यांच्यासह अनेक देशांच्या प्रमुखांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.