विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ पुढच्या महिन्यात संपणार असल्यानं सभागृहानं आज त्यांना निरोप दिला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दानवे यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा आढावा घेतला. जनतेचे प्रश्न ठळकपणे मांडता यावेत यासाठी अभिनव आंदोलनं करण्यात दानवे यांनी हातोटी असून विरोधी पक्षनेता म्हणून अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. त्यांची राजकारणातली मोठी कारकीर्द अजून बाकी आहे. त्यांनी लवकरच पुन्हा सभागृहात यावं, असं फडनवीस म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा स्पष्टवक्तेपणा, थेट संवाद साधण्याची हातोटी याकडे लक्ष वेधलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबादास दानवे यांच्या कारकिर्दीत हा पूर्णविराम नाही, तर स्वल्पविराम ठरावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेचे एक उत्तम, यशस्वी विरोधी पक्षनेते म्हणून दानवे यांचं नाव घेतलं जाईल, असं प्रतिपादन केलं.
विरोधी पक्षनेता आक्रमक असावा, पण आक्रस्ताळी नसावा, तसे दानवे आहेत, असं ते म्हणाले. भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर, काँग्रेसचे नेते सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल परब यांनीही दानवे यांच्या गौरवार्थ भाषणं केली. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दानवे यांच्या तडफदार आणि तात्त्विक मांडणीबद्दल त्यांचं कौतुक केलं.