‘सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी सामान्य माणसाला आध्यात्मिक दिशा दाखविण्याबरोबर समाजात समता स्थापन करण्याचा विचार दिला. ही विचारसरणी राज्यासह देशासाठी महत्वाची आहे’, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नाशिक इथं आयोजित अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या 38 व्या अधिवेशनात ते काल बोलत होते. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, खासदार भास्कर भगरे, परिषदेचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मोहन कारंजेकर बाबा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
रिद्धपूर या तीर्थक्षेत्रानं मराठी भाषा जिवंत ठेवण्याचं काम केलं असून या समृद्ध योगदानाची दखल घेत रिध्दपूर इथं मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात आलं आहे. हे विद्यापीठ जागतिक कीर्तीचं व्हावं यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले,
गुजरातमधनं ते आपल्या विदर्भाच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आले. पण या ठिकाणी मराठीची जी सेवा त्यांनी केली. आज आपली मराठी भाषा अभिजात झाली या अभिजात भाषेच्या संपूर्ण प्रवासामध्ये दोन ग्रंथ, हे अत्यंत महत्त्वाचे ठरले की ज्यांनी आपल्या भाषेच्या अभिजात असण्याचा पुरावा दिला त्यातला एक ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे तर दुसरा ग्रंथ लीळा चरित्र आहे.
‘महानुभाव पंथाच्या समस्या सोडविण्यात येतील’, असंही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महानुभव पंथीयांचे अनेक प्रश्न सोडवल्याचं परिषदेचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मोहन कारंजेकर बाबा यांनी याप्रसंगी नमूद केलं.