२६/११ च्या मुंबई हल्ल्यातल्या शहिदांना आदरांजली

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला आज १७ वर्ष पूर्ण झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या हल्ल्यातल्या शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकानं कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करावा आणि मजबूत तसंच अधिक वैभवशाली भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी वाटचाल करावी, असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यातल्या  शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे. दहशतवाद हा फक्त एखाद्या देशासाठी नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी अभिशाप आहे, असं शाह यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

 

मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री आशीष शेलार आणि  मंगल प्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथल्या पोलीस शहीद स्मारकावर जाऊन शहीदांना वंदन केलं आणि पीडितांना श्रद्धांजली वाहिली. राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनीही शहीदांना आदरांजली वाहिली. 

 

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय सुरक्षा दल अर्थात एनएसजीतर्फे आज संध्याकाळी गेट वे ऑफ इंडिया इथं एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अशा प्रकारचे हल्ले पुन्हा होऊ नयेत यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी केला जाणार आहे. मुंबईतल्या ११ महाविद्यालयं आणि २६ शाळांमधले विद्यार्थी या शपथग्रहण कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ‘कधीही नाही‘ या संकल्पनेअंतर्गत युवकांमध्ये शांतता, सतर्कता आणि राष्ट्रीय सुरक्षा या मूल्यांच्या बळकटीकरणासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

 

लोकसभेतले  विरोधी पक्षनेते  राहुल गांधी यांनीही मुंबई हल्ल्यातल्या  शहीदांना आणि बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली. दहशतवादाविरोधात देश नेहमी एकजुटीनं उभा राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.