गेल्या ११ वर्षांच्या कार्यकाळात केंद्रसरकारने सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी भरीव उपाययोजना केल्या आहेत. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांनी प्रेरित होऊन भारताने गेल्या दशकात उल्लेखनीय परिवर्तन अनुभवलं आहे. त्यात प्रामुख्याने भारताच्या आरोग्य सेवेचा समावेश आहे. आयुष्मान भारतसारख्या प्रमुख उपक्रमांनी जवळजवळ ५५ कोटी लोकांना आर्थिक संरक्षण दिलं आहे.
आयुष्मान वय वंदना योजनेंतर्गत ७० वर्षं आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य हमीचे योजनेचे फायदे देण्यात आले आहेत. आयुष्मान भारत डिजिटल मिशनने आरोग्यसेवेचं आधुनिकीकरण केलं असून ७८ कोटींहून अधिक आयुष्मान भारत आरोग्य खाती तयार झाली आहेत. आयुष्मान भारत अंतर्गत येणाऱ्या आरोग्याशी संबंधित पायाभूत सुविधांच्या योजनेमुळे आरोग्य सेवेचा विस्तार झाला आहे.
ईशान्येकडच्या राज्यांमध्ये एम्स रुग्णालयांची स्थापना हे आरोग्य सेवेसाठी सरकारच्या वचनबद्धतेचं प्रतीक ठरलं आहे. जगभरात कोविडची साथ पसरली असतानाही भारताने त्याला रोखण्यासाठी विमानतळावरच्या तपासणीपासून ते लॉकडाऊन जाहीर करणं, टास्क फोर्सची स्थापना करणं आणि लस निर्मिती पर्यंतची मजल मारली. गेल्या ११ वर्षांच्या काळात सर्वांसाठी आरोग्य या तत्वावर सरकारनं आरोग्य सेवेचा विस्तार केला असून त्याच्या गुणवत्तेत सुधारणा घडवून आणली आहे.