गडचिरोलीत 11 नक्षली मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शरण

गडचिरोली इथं विमला सिडाम उर्फ तारक्का हिच्यासह 11 नक्षल्यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शरणागती पत्करली. तारक्का मागील 38 वर्षांपासून नक्षल चळवळीत होती. संविधानविरोधी आणि देशविरोधी कृत्यामुळे आपला विकास होत नाही हे नक्षल्यांच्या लक्षात आल्यामुळे अनेक जण देशाची व्यवस्था आणि संविधानावर विश्वास ठेवून मुख्य प्रवाहात येत आहेत असं फडणवीस यावेळी म्हणाले. याप्रसंगी उल्लेखनीय कामगिरी करणारे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. फडणवीस यांनी भामरागड तालुक्यातील पेनगुंडा आणि एटापल्ली तालुक्यातील गर्देवाडा या नक्षलग्रस्त पोलिस मदत केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. शिवाय सर्वसामान्य लोक आणि जवानांसोबत संवाद साधला. गर्देवाडा इथं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सुरु झालेल्या एसटीचा शुभारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.