भाजपाचे ज्येष्ठ नेते राज पुरोहित यांचं निधन

माजी मंत्री  आणि वरिष्ठ भाजपा नेते राज पुरोहित यांचं आज मुंबईत   प्रकृती अस्वास्थ्यामुळे  निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते. 

पुरोहित यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नगरसेवकपदापासून केली. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेत त्यांनी २५ वर्षं आमदार म्हणून काम केलं. ते मुंबईतील मुंबादेवी आणि कुलाबा विधानसभा मतदारसंघातून १९९०, १९९५, १९९९ आणि २००४ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये निवडून आले होते. तसंच १९९५ ते १९९९ दरम्यान, युती सरकारमध्ये त्यांनी  कामगार, दुग्धविकास आणि संसदीय कार्य मंत्री म्हणून जबाबदारी पाहिली. तसंच नंतर गृहनिर्माण मंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं. दक्षिण मुंबईतल्या स्थानिक  विशेषतः भाडेकरुंच्या प्रश्नांवर त्यांनी काम केलं.

ते काही काळ भाजपाचे मुंबई अध्यक्षही होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळाली नाही. नुकत्याच झालेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत त्यांचे पुत्र आकाश पुरोहित हे निवडून आले आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज पुरोहित यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. दृढता आणि आक्रमकता हा त्यांचा स्थायीभाव होता, त्यांच्या निधनामुळे भाजपाने एक दिलदार व्यक्तिमत्व गमावलं आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी पुरोहित यांना श्रद्धांजली वाहिली. पुरोहित यांचा तळागाळातल्या लोकांशी संपर्क होता, त्यांच्या निधनामुळे राज्याने एक अनुभवी नेता गमावला आहे, असं तावडे म्हणाले. राज पुरोहित यांनी कुलाबा आणि मुंबादेवी मतदारसंघाच्या प्रगतीसाठी दिलेलं योगदान सदैव स्मरणात राहील, असं भाजपा नेते आणि मंत्री आशीष शेलार यांनी समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. 

पुरोहित यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी मुंबईतल्या त्यांच्या निवासस्थानी ठेवलं आहे. चंदनवाडी इथल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.