डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पुण्यात स्वच्छता मोहिम राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुण्यात काल अतिवृष्टीमुळे पसरलेला चिखल आणि गाळ यांच्या सफाईसाठी खाजगी कंपन्यांच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसंच पुरामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि महापालिका यांच्यातल्या समन्वयाअभावी कालची पूरपरिस्थिती उद्भवली. यापुढे प्रशासन तसंच अधिकाऱ्यांनी समन्वय साधण्याची काळजी घ्यावी, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शासकीय विश्रामगृह आयोजित आढावा बैठकीत दिले. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग दुपारी पुर्णपणे बंद करण्यात आला. मात्र आवश्यकता भासल्यास धरणातून पुन्हा विसर्ग करण्यात येईल अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागानं दिली आहे.

 

धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातल्या कान नदीवरचं मालनगाव मध्यम प्रकल्प पावसामुळे शंभर टक्के भरला आहे. कान नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन पाटबंधारे विभागाने केलं आहे. कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे सांगली, मिरज शहरासह ग्रामीण भागातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. नदीकाठच्या नाागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

 

सांगली जिल्ह्यात पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी शंभर जणांचं लष्करी पथक तैनात करण्यात आलं आहे. या पथकात प्रत्यक्ष सैनिकांसोबतच वैद्यकीय तसंच अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

 

कोल्हापूर जिल्ह्यातले ११ राज्य महामार्ग आणि ३७ प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण ४८ रस्ते अतिवृष्टीमुळे वाहतूकीसाठी बंद आहेत अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या २४ तासात झालेल्या पावसाने पंचगंगेची पाणीपातळी दीड फुटांनी वाढून शेकडो गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. कोल्हापूर शहरातही पुराचे पाणी शिरले आहे.

 

गडचिरोली जिल्ह्यात आज अधूनमधून पावसाची रिपरिप सुरु होती. गोसेखुर्दमधून होणारा विसर्ग कमी केल्याने गडचिरोली-आरमोरी, गडचिरोली-चामोर्शी, गडचिरोली-मूल या प्रमुख मार्गावरील वाहतूक सुरु झाली आहे. मात्र, पर्लकोटा नदीला पूर आल्याने आलापल्ली-भामरागड आणि दिना नदीच्या पुरामुळे आष्टी-आलापल्ली या या मार्गांवरील वाहतूक बंद आहे. भामरागड तालुक्यात सर्वाधिक ८७.३ मिलिमीटर पाऊस पडला. त्याखालोखाल एटापल्ली तालुक्यात ६५.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातलं इटीयाडोह धरण १०० टक्के भरलं आहे.

 

नंदूरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यात झालेल्या पावसानं सुरत-भुसावळ रेल्वे मार्ग प्रभावित झाला आहे. त्यामुळं या मार्गावरच्या काही गाड्यांचे मार्ग बदलले असून उधना-नंदूरबार मेमो रद्द झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात रंगावली, नेसू तसंच सरपणी नद्यांना पूर आला आहे.

 

रायगड जिल्ह्यात खवळलेल्या समुद्रामुळे अलिबागजवळ अडकलेल्या मालवाहू जहाजावरून चौदा कर्मचाऱ्यांची भारतीय तटरक्षक दलानं सुटका केली.

 

मुंबईत मात्र आज पावसाने विश्रांती घेतली. मोरबे धरण क्षेत्रात झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणात ७४ टक्के पाणीसाठा भरला आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने एका वेळच्या पाणीपुरवठ्यात केलेली कपात रद्द केली आहे.