आरोग्य व्यवस्था भक्कम झाल्यामुळं गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेत अमूलाग्र परिवर्तन घडून येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अहेरी इथल्या महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आता २ हजार ४०० आजारांचा समावेश करण्यात आला असून, त्याचा फायदा गोरगरीब नागरिकांना होईल असं त्यंनी सागितलं.
कोठी आणि रेगडी इथलं प्राथमिक आरोग्य केंद्र, वेंगणूर इथलं उपकेंद्र, जारावंडी आणि ताडगाव इथल्या प्राथमिक आरोग्य पथकांच्या इमारती तसंच चामोर्शी, मुलचेरा, धानोरा, एटापल्ली इथल्या आयुष्यमान आरोग्य मंदिराचं लोकार्पण यावेळी मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन पद्धतीनं केलं. सिरोंचा इथल्या बहु विशेषोपचार रुग्णालयाचं तसंच वैद्यकीय आणि नर्सिंग महाविद्यालयाचं भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं.
‘आदिशा‘ प्रकल्पाच्या अंतर्गत स्वयंसहाय्यता बचत गटांना साडेतीन कोटी आणि प्रत्येक महिला बचत गटाला एक लाख रुपयांचं फिरतं भांडवलही फडणवीसांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं.