जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकीसाठी आज विविध जिल्ह्यात आरक्षण सोडत जाहीर झाली. पुणे जिल्हा परिषदेतल्या ७३ गटांपैकी सात जागा अनुसूचित जातीसाठी, पाच जागा अनुसूचित जमातीसाठी, तर १९ जागा इतर मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ७४ पैकी ३७ गट महिलांसाठी राखीव आहेत, दहा जागा इतर मागास प्रवर्गातल्या महिलांसाठी, ९ जागा सर्वसाधारण प्रवर्गातल्या महिलांसाठी, १५ अनुसूचित जमातीतल्या महिलांसाठी तर तीन जागा अनुसूचित जातीतल्या महिलांसाठी आरक्षित आहेत. सांगली जिल्हा परिषदेतल्या ६१ जागांसाठीही आरक्षण सोडत काढण्यात आली.
अहिल्यानगर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ७५ गटांपैकी इतर मागास प्रवर्गासाठी २०, अनुसूचित जातीसाठी ७ तर अनुसूचित जमातीसाठी ९ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नंदुरबारमधल्या ५६ गटांपैकी एक जागा अनुसूचित जातीसाठी, ११ जागा इतर मागास प्रवर्गासाठी तर ४४ जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असतील. धुळे जिल्हा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ५६ गटांपैकी २३ जागा अनुसूचित जमातीसाठी, ३ अनुसुचित जाती तसंच १५ जागा इतर मागास प्रवर्गासाठी राखीव आहेत.
बीड जिल्हा परिषदेतल्या ६१ गटांपैकी सोळा गट इतर मागास प्रवर्गासाठी ऱाखीव आहेत, यातील आठ गट महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेतल्या ६३ जागांपैकी १७ जागा इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. तर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आठ जागा राखीव आहेत.