राज्यातल्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्या संपणार आहे. १६ जानेवारीला अर्ज भरायला सुरुवात झाली होती. २२ जानेवारीला अर्जांची छाननी होईल आणि २७ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होईल आणि मतदान चिन्ह वाटप होईल. ३ तारखेला मध्यरात्रीपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येईल आणि ५ फेब्रुवारीला सकाळी साडे ७ ते साडे ५ दरम्यान मतदान होईल. प्रत्येक मतदाराला जिल्हा परिषदेसाठी १ आणि पंचायत समितीच्या गणासाठी एक अशी दोन मतं द्यावी लागतील.
या निवडणुकीत EVMचा वापर होणार असून विधानसभेच्या मतदार यादीत १ जुलै २०२५ रोजी नाव असलेल्या मतदारांना या निवडणुकीत मतदान करता येईल. ‘मताधिकार’ या मोबाइल ॲपवरुन मतदारांना त्यांचं नाव मतदार यादीत शोधता येईल.
या निवडणुकांमध्ये २ कोटी ९ लाख मतदार मतदानाचा अधिकार बजावतील. त्यांच्यासाठी २५ हजार ४८२ मतदान केंद्र कार्यरत असतील. यासाठी १ लाख २८ हजार अधिकारी आणि कर्मचारी काम करतील, असं निवडणूक आयोगाने सांगितलं.