११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन महाराष्ट्रातही मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. अनेक मान्यवरांनी स्वतः योगसाधना उपक्रमांमध्ये सहभागी होत योग साधनेचं महत्त्व पटवून दिलं.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबईत राजभवन इंथ आयोजित योगसत्रात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सहभाग घेतला. वाढत्या ताणतणावाच्या काळात मानसिक आरोग्यासाठी योग महत्त्वाचा असल्याचं ते म्हणाले. सर्व विद्यापीठांमध्ये योगाभ्यास सुरू करण्याबाबत कुलगुरूंशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकरी भक्तीयोग कार्यक्रमात वारकऱ्यांसोबत योग साधना केली. मंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ हे देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
नागपूरमध्ये यशवंत स्टेडियम इथं झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी योग साधना केली. आरोग्यदायी जीवनासाठी सर्वांनी योगाभ्यासाचा अंगिकार करावा असं आवाहन त्यांनी केलं.
पुण्यात पंडित फार्म इथं आयोजित योगसत्रात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सहभागी झाले.
भुसावळमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन आणि संजय सावकारे यांच्या उपस्थितीत भव्य योगाभ्यास सत्र पार पडले. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत योग कार्यक्रम झाला.