योगदिनानिमित्त मुंबईत राजभवन इंथ आयोजित योगसत्रात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सहभाग घेतला. सर्व विद्यापीठांमध्ये योगाभ्यास सुरू करण्याबाबत कुलगुरूंशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
पंढरपूरची आषाढी वारी सुरु असतानाच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे. पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकरी भक्तीयोग कार्यक्रमात वारकऱ्यांसोबत योग साधना केली. मंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ हे देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
नागपूरमध्ये यशवंत स्टेडियम इथं झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी योग साधना केली. आरोग्यदायी जीवनासाठी सर्वांनी योगाभ्यासाचा अंगिकार करावा असं आवाहन त्यांनी केलं.
पुण्यात पंडित फार्म इथं आयोजित योगसत्रात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील सहभागी झाले.
भुसावळमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन आणि संजय सावकारे यांच्या उपस्थितीत भव्य योगाभ्यास सत्र पार पडले. यात विद्यार्थी, शिक्षक आणि सामान्य नागरिकांसह १० हजार जणांनी योगसाधना केली.
सांगली जिल्ह्यातही भक्तियोग या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यात विक्रमी संख्येनं ५ लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवत विश्वविक्रम रचला. वारकऱ्यांनीही ताल धरत योगासनं केली.
कोल्हापूरातही जिल्हा प्रशासन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयानं योग शालेय विद्यार्थ्यांसाठी योग सत्राचं आयोजन केलं होतं.
शिर्डीत साईबाबा संस्थानाच्या वतीनं द्वारावती भक्तनिवासासमोरच्या बागेत विशेष योग साधना कार्यक्रम आयोजित केला गेला. अमरावतीतही केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं विशेष योगसाधना सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं.
नांदेड जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, पोलिस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं योग शिबीर घेण्यात आलं. भक्ती लॉन्स इथं राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आणि आमदार बालाजी कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत योग शिबीर घेण्यात आलं.
लातूरमधे दरवर्षीप्रमाणे योगाचे महत्त्व सांगणारा संदेश देणारी रांगोळी शहरातल्या प्रमुख चौकासह सात ठिकाणी काढली आहे. वाशिम इथं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं योग दिवस साजरा करण्यात आला.
रत्नागिरीतही जिल्हा परिषदेच्या वतीनं योगशिबिराचं आयोजन केलं गेलं.
पालघरमध्ये जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमात विविध योगासनांची प्रातिक्षिकं केली गेली.
नाशिकमध्येही महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला.
गडचिरोली गोंडवाना विद्यापीठात आयोजित योग शिबिरात खासदार डॉ.नामदेव किरसान यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले. जिल्ह्यात विविध उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयं आणि पोलिस ठाण्यांमध्येही योग शिबिरांचं आयोजन केलं गेलं.
धुळे जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात जिल्हा आणि सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांनी सर्वांना निरोगी जीवनासाठी योगाभ्यास करण्याचं आवाहन केलं.
अहिल्यानगरमध्ये, जिल्हा रुग्णालयात विशेष योगसत्राचं आयोजन करण्यात आलं होतं.