जगातला तणाव आणि अस्थिरतेच्या काळात योग साधना शांततेचा मार्ग दाखवतो-प्रधानमंत्री

११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन आज सर्वत्र  मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त उत्तराखंडमध्ये डेहराडूनमध्ये झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी झाल्या होत्या. योग ही निरोगी जीवन जगण्याची कला आहे, हा केवळ व्यायामाचा प्रकार नाही तर संतुलित जीवनशैलीचा आधार आहे असं त्या यावेळी म्हणाल्या. जागतिक समुदायात योग साधनेबद्दलचा आदर वाढला असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.


योग साधनेनं आज संपूर्ण विश्वाला जोडलं आहे हे बघणं अत्यंत सुखद आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम मध्ये आज ११व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

 

आयुष मंत्रालयाच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात ३ लाख योगसाधक सहभागी झाले होते. 

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उधमपूर इथं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अहमदाबाद इथं योग साधना कार्यक्रमात सहभागी झाले. तसंच देशभरातल्या जिल्हा मुख्यालयांमधे, विद्यापीठं आणि सेवाभावी संस्थांमार्फत योग साधना कार्यक्रम आयोजित  करण्यात आला, यात विविध मान्यवर सहभागी झाले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.