X S I O इंडस्ट्री, ब्लॅकस्टोन आणि राज्याचा उद्योग विभाग यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज ५ हजार १२७ कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. गुंतवणुकीची ही रक्कम ३ हजार कोटींनी वाढवून ८ हजार कोटी करण्यात येईल, अशी घोषणा X S I O आणि ब्लॅकस्टोन कंपनीच्या वतीनं करण्यात आली. ५ हजार कोटींच्या गुंतवणूकीमुळे राज्याच्या आर्थिक विकासात हे मोलाची भर पडणार आहे,
तसंच X S I O च्या माध्यमातून नागपूर शहराला देशाचं लॉजिस्टक हब बनवण्याच्या दिशेने गती मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यानी यावेळी व्यक्त केला.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते X S I O इंडस्ट्रीयल एँड लॉजिस्टीक पार्कचं भूमीपूजन करण्यात आलं. समृद्धी महामार्गालगतच X S I O हा ७०० कोटी गुंतवणूकीचा जागतिक दर्जाचा पार्क उभारला आहे. तसंच १०५ एकरावरील दुसऱ्या टप्प्यातील ११०० कोटी गुंतवणूकीच्या उद्देशाने तयार करण्यात येणाऱ्या लॉजिस्टिक पार्कचं भूमिपूजन आज झालं. यामुळे जवळपास १० हजार रोजगार निर्माण होणार आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले. उद्योग क्षेत्रातील वस्तूंना देशांतर्गत तसंच जागतिक स्तरावर पोचवण्यासाठी आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.