प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज गुजरातमध्ये सासन गीर इथं राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची सातवी बैठक झाली. या बैठकीमध्ये लष्करप्रमुख, विविध राज्यांचे सदस्य, या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, मुख्य वन्यजीव वॉर्डन आणि विविध राज्यांचे सचिव अशा ४७ सदस्यांचा समावेश होता. या बैठकीत प्रधानमंत्र्यांनी जुनागढ इथं वन्यजीवांसाठीच्या राष्ट्रीय संदर्भ केंद्राची पायाभरणी केली. तसंच, सोळावा आशियाई सिंहगणना अहवाल, तसंच मानव-वन्यजीव संघर्ष व्यवस्थापन कार्यक्रम ‘सॅकोन’चं अनावरण केलं. तत्पूर्वी प्रधानमंत्र्यांनी गीर राष्ट्रीय उद्यानाची सफर केली आणि नंतर वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला. वन कर्मचाऱ्यांना गस्तीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या दुचाकी वाहनांनाही त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
आज जागतिक वन्यजीव संरक्षण दिवस आहे. पर्यावरण संतुलन, वन्यप्राण्याचं संरक्षण आणि संवर्धनासाठी प्रयत्न करण्याच्या उद्देशानं जागरुकता निर्माण करण्यासाठी आज देशभरात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.