आज जागतिक दूरचित्रवाणी दिन आहे. दूरचित्रवाणी हे माहिती, शिक्षण देण्याचं तसंच जनमत प्रभावित करण्याचं, संवाद साधण्याचं माध्यम म्हणून ओळखलं जातं. १९९६मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने ठराव मंजूर केल्या नंतर २१ नोव्हेंबर ला हा दिवस साजरा केला जातो. भारतातलं दूरचित्रवाणीचं जाळं देशभरातल्या २३ कोटी घरांपर्यंत विस्तारलं असून त्यामुळे जवळपास ९० कोटी प्रेक्षक जोडले गेले आहेत. यंदाच्या मार्चपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात ९१८ खासगी उपग्रह वाहिन्यांचं प्रसारण होत आहे.
प्रसार भारतीतर्फे आज दूरचित्रवाणी दिवस साजरा केला जात आहे. ऑल इंडिया रेडिओचा भाग म्हणून भारतात दूरचित्रवाणी प्रसारण सर्वप्रथम १५ सप्टेंबर १९५९रोजी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलं. त्यानंतर १९६५ मध्ये दूरदर्शन सेवेची स्थापना झाली. गेल्या वर्षी भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राने अर्थव्यवस्थेत अडीच लाख कोटी रुपयांचं योगदान दिलं आहे आणि २०२७ पर्यंत ते तीन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढेल असा अंदाज आहे.