आरोग्यविषयक जागरूकता वाढविण्यासाठी आज जगभरात सर्वत्र आरोग्य दिवस साजरा केला जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना १९४८ मध्ये या दिवशी झाली. या वर्षीच्या आरोग्य दिवसाची मध्यवर्ती संकल्पना निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य अशी आहे. माता आणि नवजात बालकांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणं हा या संकल्पनेमागचा हेतू आहे. येत्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाला ७५ दिवस उरलेले असताना आयुष मंत्रालयांतर्गत मोरारजी देसाई योग संस्थेनं आजपासून ७५ दिवसांच्या योग महोत्सवाचं ओडिशामध्ये भुवनेश्वर इथं आयोजन केलं आहे.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त आज महाराष्ट्रात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईत महाराष्ट्र आरोग्य सन्मान सोहळा-२०२५ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी आरोग्य सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यात येणार आहे तसंच विविध आरोग्य सेवा योजनांचा प्रारंभही करण्यात येणार आहे. ६ जिल्ह्यांमधे डायलिसिस सुविधेचं उद्घाटन, ई सुश्रुत या संकेतस्थळाचा विस्तार, शुश्रुषागृह नोंदणी प्रणालीचं ऑनलाईन प्रमाणपत्र वितरण, इत्यादी उपक्रमांचा त्यात समावेश आहे.
अधिक सुदृढ आणि निरोगी जग निर्माण करण्याचा संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक आरोग्य दिनानिमित्त दिलेल्या संदेशात पुन्हा एकदा व्यक्त केलं आहे. कोणत्याही प्रगतीशील समाजाचा पाया आरोग्य हाच असतो, असं त्यांनी म्हटलं आहे.