इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दावोस इथं आयबीएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद कृष्णा आणि मेटाचे मुख्य जागतिक व्यवहार अधिकारी जोएल कप्लन यांची भेट घेतली. जग भारताकडे जागतिक नवोन्मेषाचे चालक म्हणून पाहत आहे, असं वैष्णव म्हणाले. एआय पायाभूत सुविधांमधे ७० अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक होणार आहे. पुढच्या महिन्यात ५० अब्ज डॉलरची गुंतवणूक अपेक्षित आहे, असं ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात भारत दुसऱ्या श्रेणीत आहे हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखांचा दावा वैष्णव यांनी फेटाळून लावला. भारतात सध्या दोन लाख स्टार्टअप्स आहेत. सेमिकंडक्टर क्षेत्रात भारत येत्या काळात पहिल्या पाच देशात स्थान मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एआय नियमन करताना केवळ स्वतंत्र कायद्याचं नाही तर तांत्रिक – कायदेशीर दृष्टीकोनाचंही पालन करायला हवं असं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. दावोस इथं जागतिक आर्थिक मंचावर ते काल बोलत होते. डीप फेकसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी मजबूत तांत्रिक साधनांची आवश्यकता असल्याचं वैष्णव म्हणाले. डीप फेकची ओळख पटवण्यासाठी भारत तंत्रज्ञान विकसित करत आहे, असं त्यांनी सांगितलं.