मधुमेहाच्या वाढत्या धोक्याला तोंड देण्यासाठी सर्व देशांनी तातडीने कृती करण्याचं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केलं आहे. जागतिक मधुमेह दिनानिमित्त आज जारी केलेल्या संदेशात संघटनेनं म्हटलंय की, जगातली जवळजवळ एक तृतीयांश लोकसंख्या मधुमेहग्रस्त आहे. “मधुमेह – बालपणापासून वृद्धापकाळापर्यंत काळजी घेण्याची गरज” , ही या वर्षीची संकल्पना आहे. उशिरा निदान, अपुरे उपचार आणि रक्तातल्या ग्लुकोजच्या पातळीचे कमकुवत नियंत्रण यामुळे मधुमेह अजूनही एक गंभीर आजार आहे, मधुमेहाच्या तीन रुग्णांपैकी फक्त एकालाच योग्य उपचार मिळतात, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.
टाइप १ मधुमेह थांबवता येत नसला तरी, तो नियंत्रित केला जाऊ शकतो, तर नियमित शारीरिक व्यायाम आणि संतुलित आहार तसंच तंबाखू आणि अल्कोहोल सेवन टाळून टाइप २ मधुमेहाचा धोका कमी करता येतो, असंही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.