नागपुरात उद्यापासून विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन

राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूर इथं सुरूवात होत आहे. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. अत्यावश्यक सुविधा, निवारा, पार्किंग, सुरक्षा व्यवस्था वायफाय, टपाल तसंच आहार याबाबत प्रशासनानं उत्तम पद्धतीनं नियोजन केलं असल्याचं त्यांनी नागपूर इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमधे विरोधी पक्षनेतेपदाचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचं वार्ताहरांच्या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे यांनी सांगितलं. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे देखील यावेळी उपस्थित होत्या.  

 

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी महाविकास आघाडीनं बहिष्कार टाकला. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल देशमुख, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यांनी आज वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. सरकारनं विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवून चहापानाला बोलावणं, तसंच शेतकरी विरोधक असलेल्या सरकारच्या चहापानाला जाणं योग्य वाटत नसल्यानं बहिष्काराचा निर्णय घेतल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

 

कापसावरचा आयातकर ११ टक्क्यावरून शून्य टक्के केल्यानं राज्यातला कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे, सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे, राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, देशातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपैकी ३८ टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी राज्यातले आहेत, अशी टीका त्यांनी केली. राज्याची तिजोरी रिकामी झाली आहे, ९ लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज झालं आहे, निधी वाटपात भेदभाव असून लहान शहरांकडे दुर्लक्ष केलं जात आहे, कमिशनसाठी निधी वाटप होतो आहे, असे आरोप त्यांनी केले.

 

तर राज्यात अल्पवयीन मुली असुरक्षीत आहेत, कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे, महार वतनाची जमीन नियमबाह्य पद्धतीनं खरेदी केल्याप्रकरणी जमीन विकत घेणाऱ्यांविरोधात कारवाई होत नाही, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.