देशाचा इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातली उलाढाल २०३० पर्यंत २० लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात दिली. येत्या ५ वर्षात ५ कोटींहून अधिक रोजगार निर्माण करण्याची क्षमता या उद्योगात असल्याचं त्यांनी सांगितलं. आसाममध्ये झालेल्या पावसामुळे महामार्गाचं नुकसान झालं असून त्याव्यतिरिक्त महामार्गांसंबंधीच्या तक्रारींनुसार कारवाई करण्यात आली आहे. तसंच, महामार्ग दुरुस्तीचं कामही युद्धपातळीवर सुरू असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरावेळी स्पष्ट केलं. आसाममध्ये टोलवसुली होत असली तरी रस्त्यांचा दर्जा निकृष्ट असल्याचा प्रश्न काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी लोकसभेत उपस्थित केला होता.
केंद्र सरकारने धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष योजनेअंतर्गत देशभरातल्या आदिवासी गावांच्या विकासासाठी ८० हजार कोटी रुपये राखीव ठेवले आहेत, अशी माहिती आदिवासी व्यवहार मंत्री जुएल ओराम यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात दिली. आरोग्य, शिक्षण तसंच वीजपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी ६३ हजारांहून जास्त गावांमधे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे, असं जुएल ओराम यावेळी म्हणाले.