संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. विरोधी पक्ष सदस्यांनी मतदार यादी पुनरीक्षणासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी करत केलेल्या घोषणाबाजीमुळं दोन्ही सभागृहांच्या कामकाजात अडथळे आले. तत्पूर्वी दोन्ही सभागृहांनी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि विश्वचषक जिंकणारा भारतीय महिला संघ, अंध महिला क्रिकेट संघ, महिला कब्बडी संघ आणि डेफलंपिकमध्ये पदकं मिळवणाऱ्यांचं अभिनंदन केलं.
(लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू झाल्यावर विरोधी पक्ष सदस्यांनी मतदार यादी पुनरीक्षणासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली. यावर बिर्ला यांनी नाराजी व्यक्त केली आणि कामकाज सुरू ठेवण्याचं आवाहन केलं. बिर्ला आवाहनानंतरही घोषणाबाजी सुरू राहिल्यामुळे सभापतींनी दुपारी १२ वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं. त्यानंतर सभागृहाचं कामकाज सुरू झालं तेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मणिपूर वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक, तंबाखू आणि तंबाखू जन्य पदार्थांवर अधिभार लादण्यासाठी केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक, आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक, २०२५ सादर सभागृहात सादर केली. मणिपूर वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आलं. दरम्यानच्या काळात विरोधी पक्षांची घोषणाबाजी सुरू राहिल्यामुळे कामकाज तहकूब करण्यात आलं.
राज्यसभेत कामकाज सुरू झाल्यावर नॅशनल कॉन्फरन्सचे गुरविंदर सिंग ओबेरॉय, चौधरी मोहम्मद रमजान आणि सज्जाद अहमद किचलू यांनी सदस्य म्हणून शपथ घेतली. पहिल्यांदाच राज्यसभेचे अध्यक्षपद भूषवणारे अध्यक्ष सी.पी. राधाकृष्णन यांचं स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. राधाकृष्णन यांचा उपराष्ट्रपतीपदापर्यंतचा प्रवास लोकशाहीची खरी ताकद दर्शवतो असं मोदी यावेळी म्हणाले.
राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राधाकृष्णन हे निःपक्षपातीपणे वागणूक देतील, अशी आशा व्यक्त केली. त्यानंतर विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे राज्यसभेचं कामकाजही २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी पुरवणी मागण्या सादर केल्या. याशिवाय उत्पादन शुल्क आणि आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक सादर झालं. मतदार यादी पुनरीक्षणाच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष सदस्यांनी चर्चेची मागणी केली. त्यावर उत्तर देताना संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं म्हटलं. मात्र, या उत्तराने समाधान न झाल्यामुळे विरोधकांना सभात्याग केला. त्यानंतर शून्य प्रहर, विशेष उल्लेख झाले आणि दिवसभराचं निर्धारित कामकाज झाल्यानंतर राज्यसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं.)