पारंपरिक औषधशास्त्राला योग्य ते महत्त्व दिलं जात नसून ते वाढवण्यासाठी विज्ञानाद्वारे लोकांचा विश्वास संपादित करणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. पारंपरिक औषधांवरच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक परिषदेत ते नवी दिल्लीत बोलत होते. पारंपरिक औषधशास्त्राला चालना देण्यासाठी संशोधन, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि नियमन आराखडा तयार करणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं.
या कार्यक्रमात माय आयुष एकात्मिक सेवा पोर्टल, आयुष उत्पादनं आणि सेवांसाठीचं मानक असलेला आयुष मार्क, योग प्रशिक्षणाविषयीचा जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल, आयुष मंत्रालयाच्या ११ वर्षांच्या वाटचालीचा लेखाजोखा घेणारं एक पुस्तक, तसंच अश्वगंधा या औषधी वनस्पतीचं चित्र असलेल्या एका विशेष टपाल तिकिटाचं अनावरण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झालं. जागतिक आरोग्य संघटनेचे महासचिव टेड्रोस घेब्रेयसुस, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा, आयुषमंत्री प्रतापराव जाधव आणि इतर यावेळी उपस्थित होते.