जगभरातल्या लाखो लोकांच्या आरोग्यावर तापमान वाढीचे गंभीर परिणाम होत असल्याचा इशारा WMO, अर्थात जागतिक हवामान संघटनेनं दिला आहे. जगातल्या अनेक प्रदेशांमध्ये वारंवार उष्णतेची लाट येत असून, यंदाच्या वर्षी समुद्राच्या पृष्ठभागावर देखील आतापर्यंतचं तिसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च तापमान नोंदवलं गेल्याचं WMO च्या आकडेवारीत म्हटलं आहे.
गेल्या आठवड्यात पश्चिम आशिया, दक्षिण मध्य आशिया, उत्तर आफ्रिकेचा बहुतांश भाग, दक्षिण पाकिस्तान आणि नैऋत्य अमेरिकेत कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवलं गेल्याचं यात म्हटलं आहे.
तापमानवाढीमुळे जगभरात विनाशकारी वणव्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे जीवितहानी होत असून, हवेची गुणवत्ता खालावल्याचं WMO ने नमूद केलं आहे.