मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सागरी किनारपट्टीवर आज उंच लाटा उसळतील असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. यावेळी लहान बोटींनी समुद्रात जाऊ नये, तसंच किनारपट्टी जवळ पर्यटन आणि जलक्रीडा पूर्णपणे थांबवाव्यात असे निर्देश राज्य आपत्कालीन केंद्रानं दिले आहेत.
पालघर पुणे आणि नाशिकच्या घाट परिसरात हवामान विभागानं आज रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक आणि साताऱ्याच्या घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, पुणे, कोल्हापूरचा घाट परिसर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, नागपूर, वर्धा, अमरावती, भंडाऱ्यासह विदर्भाला आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यात आज सकाळपासून मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. नाशिकमधे काल संध्याकाळी साडे पाच ते आज सकाळी साडे आठ वाजेपर्यंत ६१ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. रायगड जिल्ह्यात अंबा नदी आणि कुंडलिका नदी दुपारी १ वाजता धोका पातळीच्यावर वाहत होत्या. तर पाताळगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली होती. त्यामुळं प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत तसंच जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.