आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, पश्चिम बंगालच्या काही भागात आणि केरळमध्ये तुरळक ठिकाणी आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राजस्थान, पंजाब आणि हरियाणा सोडून देशाच्या सर्व भागांमध्ये तापमान सामान्य किंवा थोडंफार अधिक राहण्याची शक्यता असून नवीदिल्लीत १ मे पासून वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
झारखंडमधल्या अनेक भागांसाठी आज हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला असून येत्या १ मे पर्यंत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. राजधानी रांची इथं कालबैसाखीमुळे तापमान १० डिग्री सेल्सिअसने अचानक कमी झालं होत. परंतु आज तापमान पुन्हा एकदा वाढलं असून कमाल तापमान ३५ डिग्री सेल्सियस पर्यंत नोंदवलं गेलं आहे.
हिमाचल प्रदेशात लू चा प्रकोप सुरु असून तापमान २ ते ५ डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढलं आहे. येत्या १ मे पर्यंत ही उष्णलहर सुरु राहणार असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे. राज्यात किमान तापमान लाहौल स्पिती इथं ३ पूर्णांक ३ दशांश सेल्सिअस तर कमाल तापमान उना इथे ४२ सेल्सिअस होतं.
छत्तीसगढच्या अनेक भागांमध्ये काल रात्री पडलेल्या पावसामुळे नागरिकांना उन्हाळ्यातून दिलासा मिळाला आहे. काही भागांमध्ये आजदेखील पाऊस किंवा गारा पडण्याची शक्यता असल्यामुळे हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला केला आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये येत्या १ मे पर्यंत हवामान कोरडं राहण्याची शक्यता असून २ आणि ३ मे ला वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने सांगितली आहे. जम्मू भागात उष्णलहरींची शक्यता असून नागरिकांनी दुपारच्या वेळात घराबाहेर पडणं टाळण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.