महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कोल्हापूरमध्ये राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले असून साधारण साडेपाच हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 22 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
तसंच, मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत उद्यापर्यंत समुद्र खवळलेला असेल आणि उंच लाटा उसळतील असा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत लहान होड्यांनी समुद्रात जाऊ नये अशी सूचना प्रशासनानं केली आहे. स्थानिक प्रशासनालाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.