वेव्हज् हा फक्त एका परिषदेचं संक्षिप्त नाव नाही, तर खरोखर एक सांस्कृतिकतेची, सर्जनशीलतेची, जागतिक स्तरावर परस्परसंबंधांची लाट आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. मुंबईत जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटर इथे सुरू असलेल्या वेव्हज् अर्थात जागतिक दृक्श्राव्य मनोरंजन शिखर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
वेव्हज् हे एक असं जागतिक व्यासपीठ आहे. जे तुमच्यासारख्या प्रत्येक कलाकाराचं आहे. त्यामुळे प्रत्येक कलावंत सर्जनशीलतेच्या जगाशी जोडला जाईल, असंही ते यावेळी म्हणाले. यावेळी मोदी यांनी ३२ विविध स्पर्धांमधून अंतिम फेरीत पोहोचलेल्या ८०० स्पर्धकांचं अभिनंदनही केलं.
प्रथमच भरणाऱ्या या परिषदेला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वेव्हज् परिषदेमुळे देशातल्या आशय निर्मात्यांना जगभरातल्या गुंतवणूकदारांशी संपर्क निर्माण करण्याची संधी मिळत आहे, असं मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. या परिषदेत देशातले ७६हून जास्त नेते आणि उद्योगक सहभागी होत असून यामुळे मनोरंजन आणि नवनिर्मिती क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर मुंबईचं स्थान बळकट व्हायला मदत होईल, असंही ते यावेळी म्हणाले. वेव्ह्ज ही केवळ एक परिषद नसून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली एक चळवळ असल्याची प्रतिक्रिया अभिनेता शाहरुख यांनी दिली आहे.
या परिषदेला चित्रपटसृष्टीतून शाहरुख खान, रजनीकांत, अक्षय कुमार, विकी कौशल, प्रसून जोशी, सारा अली खान, सैफ अली खान, दीपिका पदुकोण, शाहीद कपूर, बॉबी देओल, आमीर खान, आलिया भट, रणबीर कपूर, मनीषा कोईराला, नुसरत भरुचा, शोभिता धुलिपाला, अनिल कपूर, अनुपम खेर यांच्यासह मनोरंजन क्षेत्रातले अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रधानमंत्री मोदी आज केरळला जात असून, तिथं विळिंजम आंतरराष्ट्रीय बंदराचं लोकार्पण करणार आहेत. त्यानंतर आंध्र प्रदेशात अमरावती इथं ते ५८ हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. सात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे.