पहिल्यावहिल्या वेव्ह्ज, अर्थात जागतिक दृक् श्राव्य मनोरंजन परिषद २०२५ चं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या परिषदेचा उद्देश, माध्यमं, मनोरंजन आणि डिजिटल नवोन्मेष क्षेत्रातली भारताची प्रतिभा अधोरेखित करणं, तरुणांसाठी नवनिर्मितीच्या अभिनव संधी उपलब्ध करून देणं आणि त्यांना व्यासपीठ देणं, असा आहे.
वेव्ह्ज २०२५ साठी स्वप्ननगरी मुंबई सज्ज झाली आहे. १५ हजार वर्ग मीटर परिसरात पसरलेल्या या भव्य परिषदेत माध्यमं, मनोरंजन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्ती, कंपन्या आणि या क्षेत्रात येऊ पाहणारी नवी प्रतिभा एकत्र येणार आहे. पहिलावहिला जागतिक माध्यम संवादही या परिषदेत होईल, याशिवाय, सर्जक आर्थिक क्षेत्राला चालना देण्यासाठी सर्वसमावेशक वेव्ह्ज बाजार आयोजित केला आहे.
गेल्या जवळपास वर्षभराच्या कालावधीत देशभरात झालेल्या ३२ क्रिएट इन इंडिया चॅलेंजमधून निवडलेल्या स्पर्धकांचा क्रिएटोस्फिअर हेही वेव्ह्ज परिषदेचं आकर्षण आहे. ‘कला टू कोड’ या विषयावर आधारित भारत पॅव्हिलियन वेव्ह्जमध्ये उभारलं आहे. यात, कला, कृती, दृष्टी आणि क्रिएटर्स लीप या चार विभागांद्वारे भारताची समृद्ध कथाकथन परंपरा नागरिकांना अनुभवता येईल. याशिवाय विविध प्रदर्शनं, दालनं, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेलही वेव्ह्ज २०२५ मध्ये असणार आहे.