वेव्ह्ज परिषद दर वर्षी भरवण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची इच्छा असून तिचं आयोजन मुंबईतच होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह वेव्ह्जच्या तयारीचा त्यांनी आज आढावा घेतला. अशा प्रकारची जगातली सर्वात मोठी परिषद असून जगभरातल्या १०० पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी यात सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी स्थापन करण्याबद्दलचा सामंजस्य करार राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात आज झाला. या क्षेत्राला चालना देण्यासाठी मालाड इथं एक स्वतंत्र यंत्रणा उभारायलाही केंद्र सरकारनं मंजुरी दिल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं.
वेव्ह्ज २०२५ मुळे नागरिकांच्या सृजनशीलतेला वाव आणि व्यासपीठ मिळेल, असा विश्वास केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला.