डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पहिल्या जागतिक दृक्‌श्राव्य मनोरंजन शिखर परिषदेचं मुंबईत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

देशात सध्या ऑरेंज इकॉनॉमी अर्थात सर्जनकेंद्रीत अर्थव्यवस्थेचा उदय होतो आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटर इथे सुरू असलेल्या वेव्हज् अर्थात जागतिक दृक्‌श्राव्य मनोरंजन शिखर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यात आशय, सर्जनशीलता आणि संस्कृती हे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत असं ते म्हणाले. 

 

तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत असताना जगात मानवी संवेदना जागृत ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची त्यांनी व्यक्त केली. हजारो वर्षं गीत, संगीत, नृत्य या कामी आपली मदत करत असून आगामी काळात पण त्याच आधारे आपल्या राहायचं आहे, असं त्यांनी सांगितलं. 

 

वेव्हज् हे फक्त एका परिषदेचं संक्षिप्त नाव नाही, तर खरोखर एक सांस्कृतिकतेची, सर्जनशीलतेची, जागतिक स्तरावर परस्परसंबंधांची लाट आहे, असं ते म्हणाले… 

यावेळी मोदी यांनी ३२ विविध स्पर्धांमधून अंतिम फेरीत पोहोचलेल्या ८०० स्पर्धकांचं अभिनंदनही केलं. 

(क्रियेटिव्हिटीला प्रोत्साहन देणं आणि तिला जगभरात पोहोचवण्यासाठी कनेक्टिव्हिटी देणं या उद्देशाने वेव्हज् या पहिल्या जागतिक दृक्‌श्राव्य मनोरंजन परिषदेचं आयोजन मुंबईत करण्यात येत आहे. या परिषदेला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वेव्हज् परिषदेमुळे देशातल्या आशय निर्मात्यांना जगभरातल्या गुंतवणूकदारांशी संपर्क निर्माण करण्याची संधी मिळत आहे, असं मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. या परिषदेत देशातले ७६हून जास्त नेते आणि उद्योगक सहभागी होत असून यामुळे मनोरंजन आणि नवनिर्मिती क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर मुंबईचं स्थान बळकट व्हायला मदत होईल, असंही ते यावेळी म्हणाले. वेव्हज् ही केवळ एक परिषद नसून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली एक चळवळ असल्याची प्रतिक्रिया अभिनेता शाहरुख खान यांनी दिली आहे. या परिषदेला चित्रपटसृष्टीतून शाहरुख खान, रजनीकांत, अक्षय कुमार, विकी कौशल, प्रसून जोशी, सारा अली खान, सैफ अली खान, दीपिका पदुकोण, शाहीद कपूर, बॉबी देओल, आमीर खान, आलिया भट, रणबीर कपूर, मनीषा कोईराला, नुशरत भरुचा, शोभिता धुलिपाला, अनिल कपूर, अनुपम खेर यांच्यासह मनोरंजन क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते.)

 

माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात भारत सर्जनशीलतेचं शक्तिकेंद्र म्हणून जगाचं नेतृत्व करायला भारत तयार आहे, हे वेव्हज् परिषदेमुळे लक्षात येत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी यावेळी केलं. माहिती तंत्रज्ञान, कौशल्य आणि क्षमता ही महाराष्ट्राची बलस्थानं असल्याचं सांगत त्यांनी सर्व जगाला भारताच्या नव्या ‘क्रिएटिव्ह व्हेव्ज’चं स्वागत करण्याचं आवाहन केलं. 

 

माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन येत्या शनिवारी वेव्हज् परिषदेत इंडियाज लाईव्ह इव्हेंट्स इकॉनॉमी – अ स्ट्रॅटेजिक ग्रोथ इम्पेरिटिव्ह या श्वेतपत्रिकेचं अनावरण करणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा