राज्याच्या विविध भागात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून काल गोसेखुर्द धरणाचे 9 दरवाजे उघडण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे तेरेखोल, कर्लीसह काही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कर्ली नदी इशारा पातळीच्या वरून वाहत असल्याने नदीकाठच्या गावांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातली जगबुडी आणि राजापूर तालुक्यातली कोदवली या दोन नद्यांनीही इशारा पातळी ओलांडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. जिल्ह्यातले 52 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तर भागात जोरदार पाऊस सुरू असून या आढळा प्रकल्प भरला आहे.