भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील धर्मनिरपेक्षता वक्फ सुधारणा विधेयकातून प्रतिबिंबित होत असल्याचं प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. वक्फ सुधारणा विधेयक हे कोणत्याही धर्माच्या विरोधात किंवा कोणाच्याही आस्थेला ठेस पोहचविणारे नाही. त्यामुळे ज्यांची सद्सद्विवेकबुद्धी जिवंत आहे अशी प्रत्येक व्यक्ती या सुधारणा विधेयकाला पाठिंबा दर्शवेल असं ते म्हणाले.
जुन्या कायद्यात वक्फ बोर्डाला अमर्याद अधिकार होते. चुकीच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याची मुभा नव्हती. हे सुधारणा विधेयक जुन्या चुका दुरुस्त करण्याची संधी देईल, असं ते म्हणाले. यापूर्वीच्या कायद्यामुळे गावेच्या गावे किंवा अनेकांच्या जमिनी वक्फमध्ये दाखवून त्या लाटल्या जात होत्या. जमिनी काढण्याचे हे प्रकार सुधारणा विधेयकामुळे थांबणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या विधेयकाचं स्वागत केलं आहे. काही मुठभर लोकांच्या हातात वक्फ बोर्डाची मालमत्ता ठेवण्यापेक्षा गरीब मुसलमानांसाठी शाळा, रुग्णालये उभारणं गरजेचं आहे. या विधेयकामुळे मुस्लिम समाजाचा सर्वांगीण विकासाचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले. निवडणुकीत मुस्लिम मतांसाठी राजकारण करणाऱ्यांचे खरे चेहरे आज या विधेयकाच्या निमित्ताने समोर आले, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या विधेयकावर टीका केली आहे. भाजपा सरकार वक्फ विधेयकाकडे धार्मिक नजरेने पाहून ती जमीन ताब्यात घेऊन उद्योगपती आणि बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत आहे का? असा सवाल त्यांनी केला.