नागपूरमध्ये गेल्या सोमवारी रात्री झालेल्या हिंसक घटनेच्या पार्श्वभूमीवर, दंगलग्रस्त भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक समिती गठीत केली आहे. ही समिती दंगलग्रस्त भागात जाऊन परिस्थितीची पाहणी करेल आणि नागरिकांशी संवाद साधेल. या समितीमध्ये माणिकराव ठाकरे, हुसेन दलवाई, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, साजिद पठाण या नेत्यांचा समावेश असेल, अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी दिली.
दरम्यान, नागपूरमध्ये सोमवारी घडलेल्या हिंसाचारानंतर ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यापैकी कोतवाली, गणेशपेठ आणि तहसील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही बंदी कायम राहणार असून अन्य ठिकाणी बंदी शिथिल करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी दिले आहेत.