उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज नवी दिल्लीत नव्या संसद भवनात मतदान सुरू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सगळ्यात आधी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, जितेंद्र सिंह, प्रल्हाद जोशी, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, माजी प्रधानमंत्री एच डी देवेगौडा, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राज्यसभा सदस्य अजित गोपछडे, अशोक चव्हाण यांनी मतदान केलं.
इतर सदस्यही मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले आहेत. दुपारी १ वाजेपर्यंत सुमारे ६७ टक्के मतदान झालं. या निवडणुकीत मतदान न करायचा निर्णय बिजू जनता दल आणि भारत राष्ट्र समिती या दोन पक्षांनी घेतला आहे.
रालोआचे उमेदवार, महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीचे उमेदवार सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी आहेत.मतदानाची वेळ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असून मतमोजणी आजच होणार आहे.