भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने आज कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने समाज माध्यमावर ही माहिती दिली आहे. विराटने आत्तापर्यंत १२३ सामन्यांमध्ये ४६ पूर्णांक ८५ शतांशच्या सरासरीने ९ हजार २३० धावा केल्या आहेत.
त्याच्या १४ वर्षांच्या कारकिर्दीत सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावस्कर यांच्यानंतर विराट हा भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज बनला. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ग्रेग चॅपल याच्यानंतर कसोटी कर्णधारपदाच्या पदार्पणात दुहेरी शतकं करणारा विराट कोहली दुसरा क्रिकेटपटू आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली २०१९ मध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी मालिका जिंकली.
भारताने २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर कोहलीने आधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या टी-२० प्रकारातून निवृत्ती घेतली होती. विराटच्या निवृत्तीनंतर त्याच्या जागी आता शुभमन गिल याचं नाव कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे.