विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्र सरकारनं सरत्या वर्षात विविध उपक्रम राबवले आहेत. हे वर्ष भारतासाठी सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचं ठरलं. जगभरात भारताची वेगळी सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यात यावर्षी देशाला यश आलं आहे.
(सरत्या वर्षात प्रयागराज इथं भरलेला कुंभमेळा हा जगातला सर्वात मोठा धार्मिक सोहळा ठरला. जवळपास ६६ कोटी भाविकांनी कुंभमेळ्यात सहभाग घेतला. यामुळे श्रद्धा, अध्यात्म आणि परंपरा यांचं अद्वितीय दर्शन जगाला झालं. याच वर्षी अयोध्येतल्या राम मंदिरावर धर्मध्वजारोहण सोहळा झाला. देशाच्या सांस्कृतिक पुुनरूत्थानाचं हे प्रतीक असल्याचं मानलं जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात देशभरातून भाविक सहभागी झाले होते. यासोबतच ५२४ वर्षं जुन्या त्रिपुर- सुंदरी मंदिराचा पुनर्विकास यावर्षी पूर्ण झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पुनर्विकसित मंदिराचं उद्घाटन झालं. चोल सम्राट राजेंद्र चोल प्रथम यांच्या सागरी मोहिमेला एक हजार वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त प्रधानमंत्र्यानी गंगईकोंडा चोलपुरम इथं भेट दिली आणि भारताच्या नौदल पराक्रमाच्या वारशाचा गौरव केला. राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या दीडशेव्या वर्धापनदिनानिमित्त देशभरात कार्यक्रम साजरा झाले. प्रधानमंत्र्यांनी ७ नोव्हेंबरला या कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन केलं. त्याचप्रमाणे यावर्षी पिपरहवा इथून भगवान गौतम बुद्ध यांचे पवित्र अवशेष भारतात परत आणण्यात आले. १२७ वर्षांनंतर हे अवशेष परत आणून भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेला उजाळा देण्य़ात आला.)