देशभरात विजयादशमीचा उत्साह

आश्विन शुद्ध दशमी – विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण  आज सर्वत्र पारंपरिक पद्धतीने शस्रपूजा करून साजरा होत आहे. नवरात्रौत्सवाचा समारोप करणारा हा सण महाराष्ट्रात शिलंगणाचं सोनं लुटून साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या सणाला नवीन खरेदी केली जाते.  मात्र अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि पुराचं सावट सणावर जाणवत आहे. पिकांचं आणि फूलपिकांचं नुकसान झाल्यामुळे फुलं तोरणं यांच्या प्रमाणात घट झाली आहे. 

 

विजया दशमीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना शुभेच्छा देताना म्हटलं की, न्याय, समानता आणि सौहार्दाच्या विचारांनी प्रेरित होऊन एकत्र मार्गक्रमण करणारा समाज आणि देश निर्माण करण्यासाठी दसरा हा सण प्रेरित करेल, असं राष्ट्रपती आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाल्या आहेत. 

 

असत्यावर सत्याच्या विजयाचं प्रतिक म्हणून विजयादशमीचा सण साजरा केला जातो.  यावेळी सर्वांना साहस, बुद्धी आणि भक्तीमार्गावर निरंतर अग्रेसर राहण्याची प्रेरणा मिळावी या शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

राज्यातल्या पुराच्या संकटसमयी सर्वांनी आपद्ग्रस्त नागरिकांच्या पाठीशी उभं रहावं आणि त्यांना धीर द्यावा, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा देताना केलं आहे. 

 

धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथे आज पहाटे पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा साजरा झाला. आज पहाटे तुळजा भवानीच्या मूर्तीची मानाच्या पालखीतून मिरवणूक काढण्यात आली.