आज विजय दिवस आहे. १९७१ला पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात भारतीय जवानांनी आपलं अतुलनीय शौर्य आणि बलिदान यांच्या बळावर भारताला विजय मिळवून दिला होता आणि त्यानंतर बांगलादेशाची निर्मिती झाली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या विजयात आपलं बलिदान देणाऱ्या सैनिकांना आदरांजली वाहिली आहे. या सैनिकांनी दाखवलेलं शौर्य, पराक्रम आणि मातृभूमीप्रति असलेली त्यांची निष्ठा देशासाठी सदैव प्रेरणादायी राहील, असं राष्ट्रपती आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाल्या आहेत. भारतीय जवानांनी आपली निःस्वार्थ सेवा आणि पराक्रमाने देशाच्या इतिहासात हा क्षण कोरल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले आहेत.
विजय दिनाच्या निमित्ताने राज्यसभेतही देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीरांना आदरांजली वाहण्यात आली. सकाळी ११ वाजता राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांनी देशाला हा ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्याला आणि दृढनिश्चयाला अभिवादन केलं. या युद्धामुळे बांगलादेश या स्वतंत्र राष्ट्राचा जन्म झाल्याचं ते यावेळी म्हणाले.