केंद्र सरकारनं उडदाच्या शुल्कमुक्त आयातीला पुढच्या वर्षी ३१ मार्च २०२६ पर्यंत आणखी एका वर्षाची मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भातली अधिसूचना परकीय व्यापार महासंचालनालयानं जारी केली. उडदाच्या शुल्कमुक्त आयातीची मुदत यावर्षी ३१ मार्चला संपणार होती. या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारपेठेत वस्तू मालाच्या किमती स्थिर राहायला मदत होईल, असं सरकारनं म्हटलं आहे. भारत म्यानमार कडून उडदाची सर्वाधिक आयात करतो.
या आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत भारतानं ६० कोटी ११ लाख २० हजार अमेरिकी डॉलर इतक्या मूल्याची आयात केली आहे. त्यापैकी ५४ कोटी ९० लाख अमेरिकी डॉलर मूल्याची धान्य आयात म्यानमारमधून केली गेली आहे. म्यानमारसोबतच भारत सिंगापूर, थायलंड आणि ब्राझीलमधून उडदाची आयात करत आला आहे. त्याचवेळी मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू आणि महाराष्ट्र ही देशातली उडदाची प्रमुख उत्पादक राज्य असून, भारत हा जगातला उडदाचा सर्वात मोठा उत्पादक आणि ग्राहक देश आहे.