महाराष्ट्रात सर्व इलेक्ट्रिक वाहनांना शासनाने जाहीर केलेली टोलमाफी येत्या आठ दिवसात लागू करण्यात यावी आणि निर्णय लागू केल्यापासून आजवर वसूल झालेली टोल रक्कम परत करावी, असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज महाराष्ट्र विधानसभेत दिले. प्रश्नोत्तराच्या तासात ते बोलत होते. याबाबतचा प्रश्न शंकर जगताप यांनी उपस्थित केला होता. त्यावर वरुण सरदेसाई यांनी उपप्रश्न विचारले. सर्व संबंधित टोल नाक्यांवर टोल न घेण्याच्या सूचना आठ दिवसात देण्यात याव्यात. अशा वाहनांसाठी राज्यभर चार्जिंग स्टेशन वाढवा आणि त्यांच्या क्षमतेत देखील वाढ करा, अशा सूचना अध्यक्षांनी यावेळी दिल्या.
वाढवण बंदर ते समृद्धी महामार्ग दरम्यान होणाऱ्या नवीन रस्त्याची लांबी १८२ किलोमीटर वरून १०४ किलोमीटर इतकी कमी करण्याचं नियोजन करण्यात येत आहे. हा रस्ता ६५ गावातून जाईल अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी संबंधित प्रश्नाच्या उत्तरात दिली. हा प्रश्न अजय चौधरी यांनी उपस्थित केला होता, त्यावर मनिषा चौधरी, रईस शेख, योगेश सागर आदींनी उपप्रश्न विचारले. राज्यातल्या सर्व दारूची दुकानं स्थलांतरित करण्यासाठी संबंधित इमारतीचा ना हरकत दाखला घेणं अत्यावश्यक करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावरच्या प्रश्नाच्या उत्तरात केली. मूळ प्रश्न पिंपरी चिंचवड शहरातल्या एका दुकानाबाबत शंकर जगताप यांनी उपस्थित केला होता.
राज्यात गेल्या सहा वर्षांत भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या ३० लाखांहून जास्त घटनांची नोंद झाली आहे. तर २०२१ ते २०२३ या काळात रेबीजमुळे ३० जणांना आपले प्राण गमवावे लागले, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात शिंदे म्हणाले की, स्थानिक पातळीवरच्या संबंधित संस्थांना श्वानांचं निर्बिजीकरण आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मुंबई, पुणे, नागपूर, कल्याण-डोंबिवलीसारख्या प्रमुख शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी प्रश्न विचारला होता.