मेंढेगिरी समितीच्या शिफारशीनुसार मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात पाणी सोडण्याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची संस्था मराठवाड्याला पाणी मिळू नये म्हणून न्यायालयात गेली होती, त्यामुळे त्यांच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा आपल्याला नाही असा आरोप दानवे यांनी केला. रिवर बेसिस स्टिम्युलेशन पद्धतीचा अवलंब जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी करण्याची मागणी यावेळी दानवे यांनी केली. यावर बैठक घेऊन हा निर्णय घेऊ असं आश्वासन मंत्री विखे पाटील यांनी दिलं आहे.
ठाणे इथल्या खाडी किनारी मार्गासाठी नियमबाह्य कंत्राट दिल्याचा आरोप भाजपा आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी केला. या प्रकल्पाच्या अंदाजपत्रकात तिप्पट वाढ झाली आहे, त्यामुळे यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे या प्रकरणी एसआयटीची स्थापना करण्याची मागणी दरेकर यांनी केली. मंत्री शंभुराज देसाई यांनी ही मागणी फेटाळून लावल्यामुळे भाजपा आमदारांनी काही काळ गदारोळ केला. त्यावर बैठक घेऊन या प्रश्नावर निर्णय घेण्याचं आश्वासन देसाई यांनी दिलं.