महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सकाळी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. कर्जमाफीचं आश्वासन देऊनही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही, सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाली नाहीत, कापसावरील आयात कर शून्य करून परदेशातला कापूस आयात केला जात आहे, अशी टीका विरोधकांनी केली. राज्यात दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या करत असून सरकारचं धोरण सरकारविरोधी आहे, अशी टीका करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. ]
फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. या प्रकरणातला पुढील तपास करण्यासाठी न्यायाधीशांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे, तसंच महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली पोलीस तपास करतील असं त्यांनी स्पष्ट केलं.
राज्यात इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ६५ वसतीगृहं असून इतर जिल्ह्यांमधे वसतीगृहासाठी जागा संपादित केली जात आहे, अशी माहिती फडनवीस यांनी दिली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भातला प्रश्न विचारला होता.
राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांमधे आणि विभागांमधे युनिक डिसॅबिलीटी आयडी कार्ड सादर करणं आजपासून सक्तीचं करण्यात आल्याची माहिती मागासवर्ग आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सभागृहात सांगितलं.