नोकरी – व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी विशेष सुरक्षेची गरज असून, केंद्र सरकारच्या नवीन कायद्यात यासाठी अधिक कडक शिक्षेची तरतूद असेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. सातारा जिल्ह्यातल्या फलटण इथल्या महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. याप्रकरणी महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथकासोबतच न्यायालयीन आयोगही गठीत करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्यात इतर मागास प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी ६५ वसतीगृहं असून इतर जिल्ह्यांमधे वसतीगृहासाठी जागा संपादित केली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली.
राज्यातल्या शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात पान, तंबाखू, तसंच अंमली पदार्थ मिळण्याच्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून, कायद्यात बदल करून अशा प्रकरणांमध्ये मकोका लावण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं. पान टपऱ्या उध्वस्त करण्याच्या सूचना सर्व महापालिका, नगरपालिकांना देण्यात आल्या असल्याची माहिती, गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.
राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांमधे आणि विभागांमधे युनिक डिसॅबिलीटी आयडी कार्ड सादर करणं आजपासून सक्तीचं करण्यात आल्याची माहिती मागासवर्ग आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सभागृहात दिली.
गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आलेल्या जलसंधारण विभागांतर्गत राबवलेल्या प्रकल्पांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी केली जाईल, आणि त्याचा अहवाल दोन महिन्यात सादर केला जाईल, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत सांगितलं. अनिल परब यांनी यासंदर्भातला प्रश्न विचारला होता.
जळगाव जिल्ह्यातल्या कोथळी येथील संत मुक्ताई मंदिर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शिखर समितीकडे पाठवल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. एकनाथ खडसे यांनी यासंदर्भातला प्रश्न विचारला होता.
विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सकाळी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. कर्जमाफीचं आश्वासन देऊनही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही, सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाली नाहीत, कापसावरील आयात कर शून्य करून परदेशातील कापूस देशात आयात केला जात आहे, अशी टीका विरोधकांनी केली. राज्यात दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या करत असून सरकारचं धोरण शेतकरीविरोधी आहे, अशी टीका करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीनं, राज्यातल्या विद्यापीठाच्या राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन या विषयांचा अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी ५१वा संसदीय अभ्यास वर्ग आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज या अभ्यास वर्गाचं उद्घाटन झालं. प्रत्यक्ष लोकशाहीची व्यवस्था चालते, हे समजून घेण्यासाठी हा अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं.