छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गड किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मान मिळाल्याबद्दल आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिलं. ही दुर्गसंपदा राज्याचा वारसा असून, जागतिक पातळीवर हा मान मिळणं ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. लोककल्याणसाठी तसंच स्वराज्य रक्षणासाठी या किल्ल्यांचं बांधकाम करण्यात आलं असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेवरचे विचार, कालातीत असल्याचं मत युनेस्कोच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
राज्यातल्या या किल्ल्यांचा, वारसा यादीत समावेश झाल्याबद्दल त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्री, परराष्ट्र मंत्री, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्यासह राज्यातल्या इतर अधिकाऱ्यांचे आभार मानले. युनेस्कोने दिलेलं हे नामांकन टिकवणं मोठं आव्हान असून, या किल्ल्यांचा वारसा जपण्यासाठी नागरीकांनी हातभार लावावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
CSMT स्थानकाच्या परिसरात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला नाना शंकरशेट यांचं नाव देण्याची मागणी भास्कर जाधव यांनी केली. CSMT पुनर्विकासात शिवाजी महाराज यांचा पुतळा लावण्यासाठी जागा निश्चित आहे. तसंच मुंबई सेंट्रल स्थानकाला नाना शंकरशेट यांचं नाव देण्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी रेल्वे मंत्रालयाला पाठवला आहे. त्यावर लवकर निर्णय घ्यावा यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
विधानभवनाच्या परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ अभिवादन करुन, आज आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातले इतर मंत्री आणि आमदार यावेळी उपस्थित होते.
कुठल्याही अनधिकृत बांधकामांना सरकार पाठीशी घालणार नाही आणि त्यासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिलं. मुंबईतल्या अनधिकृत बांधकामांची यादी आणि त्यांचे वर्गीकरण करण्याचे आदेश त्यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना दिले.
राज्यातल्या धरणांमधला गाळ काढण्यासंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल आपल्याकडे सादर झाला असून, त्यातल्या शिफारशींना आपण मान्यता दिली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं. मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीनंतर गाळ काढला जाईल असं ते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले. विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.